अलिबाग, 17 ऑगस्ट : वेतन मिळत नसल्यामुळे शिक्षकाने आत्महत्या केली असल्याचं प्रकरण ताज असताना आता पोलिसांने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अलिबाग इथे 3 महिन्यांपूर्वी बदलीवर आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) यांनी पोलीस मुख्यालयात अधिकारी विश्रामगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दल हादरून गेलं आहे.
मात्र, प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली याबाबत स्पष्ट कारण कळलेले नाही. प्रशांत कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. या सगळ्या प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून प्रशांत यांनी नेमकी आत्महत्या का केली याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.
प्रशांत कणेरकर हे 3 महिन्यांपूर्वी मुंबईहून अलिबाग इथे अर्ज शाखेत रुजू झाले होते. अलिबाग इथे अर्ज शाखेत रुजू झाल्यानंतर ते रजेवर गेले होते. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी पुन्हा कामावर रुजू झाले होते. 16 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास प्रशांत कणेरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे आत्महत्येमागे काही वैयक्तीक कारण असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.
प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली हे कारण स्पष्ट झालेले नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours