मुंबई, 9 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आज (सोमवार) खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबता थांबत नाही आहे. नवी मुंबईतील दिग्गज नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. गणेश नाईक येत्या 11 सप्टेंबरला भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील बेलापूर हा मतदारसंघ तसा गणेश नाईकांचा बालेकिल्ला. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडल्याने कधी नव्हे त्या भाजप पक्षाने ही उभारी घेतली आहे. पण आता नाईकांचेच कुटुंब भाजपत आल्याने स्वतः गणेश नाईक नेमके कधी भाजपमध्ये प्रवेश करणार त्यावर इथली उमेदवारी निश्चित होणार आहेत.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबद्दल पुन्हा बोलले छत्रपती संभाजीराजे, म्हणाले...
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सर्वच पक्षातील नेत्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांची भूमिका जाहीर केली आहे. राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे.
'उदयनराजे कुठेही असतील तरी मी त्यांचं स्वागत करतो,' अशी प्रतिक्रिया आता संभाजीराजेंनी दिली आहे. याआधीही संभाजीराजेंना उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी संभाजीराजेंनी उदयनराजे जर भाजपमध्ये जाणार असतील तर मी त्यांचं स्वागत करतो, असं म्हटलं होतं.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर सर्वच पक्षात हालचाली
उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले. सर्वात आधी आधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली होती.
उदयनराजेंच्या भाजपमध्ये प्रवेश केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलली जाऊ शकतात. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा भाजप प्रवेश विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. म्हणूनच राजू शेट्टी यांनीही उदयनराजेंची भेट घेतली.
'विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका, अशी उदयनराजे यांना विनंती केली आहे. त्यांनी अजून तसा निर्णय घेतला नाही,' अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर राजू शेट्टी यांनी दिली होती. त्यामुळे उदयनराजे आता नेमका काय निर्णय घेतात, हे पाहावं लागेल.
राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठीही नाही सोपं
राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. 'या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,' असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours