मुंबई, 09 ऑक्टोबर : मंगळवारी मुंबईसह उपनगरांला पावसाने झोडपून काढलं. ठाणे, डोंबिवली, भिवंडीत जोरदार पाऊस सुरू होता. डोंबिवलीमध्ये तर 4 तासांपेक्षा जास्त वीज पुरवठा खंडीत झाला होता. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं असून आता परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. बुधवार आणि गुरुवारनंतर राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
परतीच्या पावसाला सुरुवात होण्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असल्यामुळे परतीच्या पावसालाही उशिर होत आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
बुधवारी महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक पावसासह मेघगर्जना होणार असल्याचा अंदाज आहे. तर 11 आणि 12 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस तर मेघगर्जना होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर 9 आणि 10 ऑक्टोबरला मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours