मुंबई, 03 एप्रिल : देशभरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. एका दिवसात 235 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत देशभरातील आकडा 2 हजारच्या वर गेला आहे. त्यातही सर्वात जास्त रुग्णांची संख्या महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा राज्यात आहे. महाराष्ट्रात 400हून अधिक कोरोनाच्या पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आता कोरोना अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांच्या घरात किंवा कार्यालयात पोहोचू लागला आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना असतानाही नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. त्यातलीच एक अत्यावश्यक सेवा म्हणजे बेस्ट. याच बेस्टमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
कोरोनाची लागण झालेला पहिला कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. बेस्टमध्ये कोरोना शिरल्यानं आता चिंता व्यक्त केली जात असून सफाई कामगारांनंतर आता बेस्टमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. वडाळा डेपोमध्ये फोरमन म्हणून हा कर्मचारी काम करत होता. या कर्मचाऱ्याला एस. आर. व्ही. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही 14 दिवस होम क्वारंटाइनमध्ये ठेवलं जाणार आहे. टिळकनगर इमारतीमधील लोकांनी कोरोनाच्या भीतीनं आता स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात गुरुवारी 88 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 423वर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातील 54 रुग्ण मुंबईत असून 9 जण अहमदनगरचे, 11 पुण्यातले आहेत. याशिवाय 9 जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. म्हणजे MMR भागातून 63 नवे रुग्ण दाखल झाले आहेत. नवी मुंबईत 9, औरंगाबादचे 2 सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा प्रत्येकी 1 रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे तर 42 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours