पुणे 23 मे: राज्यातील साखर गाळप हंगाम कोरोनाच्या सावटाखालीच संपला असला तरी यंदा राज्यात नियोजीत अंदाजापेक्षा जास्त साखर उत्पादन झाल्याचं बघायला मिळतंय. अर्थात गतवर्षीच्या साखर उत्पादनापेक्षा यंदाचं साखर उत्पादन 40 टक्क्यांनी कमीच हे म्हणा...चालू वर्षी राज्यात 541 मेट्रिल लाख टन उसाचं गाळप पूर्ण झालं असून साखर उत्पादन 609 लाख मेट्रिक टन झालंय. दरम्यान, या कोरोनाच्या संकटातही साखर कारखानदारांनी संधी शोधत मोठ्या प्रमाणावर अल्कोहोलपासून हँड सॅनिटायझर निर्मितीकडे मोर्चा वळवलाय. राज्यातले तब्बल 80 साखर साखर कारखाने सध्या हॅड सँनिटायझरची निर्मिती करताहेत.
लागोपाठ सलग तीन वर्षांचा दुष्काळ आणि त्यानंतर सांगली, कोल्हापुरातील महापुराचं संकट, यामुळे राज्यातलं साखर गाळप तसंही कमीच अपेक्षीत होतं. यावर्षी पाच महिने चालणारा गाळप हंगाम यंदा अवघा तीन महिने चालला. त्यातही हंगामाच्या शेवटी कोरोनाचं संकट ओढवल्याने ऊसतोड कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तरीही साखर कारखानदारांनी कसाबसा आपला हंगाम उरकून घेतलाच आणि कारखान्याची धुराडी बंद केली.
गेल्या वर्षी ऊस लागवड क्षेत्रात मोठी घट झाल्याने साखर आयुक्तालयाने यंदा अंदाजे फक्त 518 लाख मेट्रिक टन उसाचं गाळप गृहित धरलं होतं. पण प्रत्यक्षात गाळप झालं 541 लाख मेट्रीक टन तर साखर उत्पादन झालं 609 लाख मेट्रिक टन झालं. ऊसाच्या कमतरतेमुळे राज्यात यावर्षी 202 पैकी अवघे 146 साखर कारखानेच चालू झाले होते. राज्यातील साखरेचा उताराही यंदाही 11.26 आसपास राहिलाय.
एफआरपीबाबत बोलायचं झालं तर चालू वर्षी साखर कारखान्यांनी 90 ते 95 टक्के एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना अदा केल्याचं साखर संचालक उत्तम इंदलकर यांनी 'न्यूज18 लोकमत'ला सांगितलं. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात राज्यावर कोरोनाचं संकट गडद झाल्याने ऊसतोड मजुरांचे घरी परतताना हाल झाले होते. तर दुसरीकडे साखर कारखानदारांनी या कोरोनाच्या संकटातही संधी संधी शोधली आणि लागलीच अल्कोहोलपासून हँन्ड सँनिटायझरची निर्मिती सुरू केलीय.
आजमितीला 80 साखर कारखाने हँड सँनिटायझर बनवत असून आतापर्यंत 23 लाख लिटर हँड सँनिटाझरची निर्मिती झालीय त्यापैकी  11 लाख लिटर सँनिटायझरची विक्री देखील झालीय. थोडक्यात या कोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेची हँड सँनिटायझरची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी साखर उद्योगाने मोठा हातभार लावल्याचं साखर संचालक उत्तम इंदलकर यांनी सांगितलं.
यंदा ऊसाअभावी साखरेचं कमी उत्पादन झालं असलं तरी यंदा साखर ऊत्पादनात चांगली वाढ होऊ शकते. कारण गेल्यावर्षी पावसाळा चांगला गेल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड झालीय. पण राज्यावरचं कोरोनाचं संकट भविष्यातही असंच गडद होत राहिलं तर ऊसतोड कामगार पुढच्या गाळप हंगामासाठी फडावर येणार का? याचाही विचार साखर कारखानदारांना आत्तापासूनच करावा लागणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours