कराड, 29 जून : भारिप बहुजान महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांना पॅरेलेसिस झाल्यासारखी अवस्था आहे, काँग्रेस तर लोक आपल्या हातात सत्ता देतील याची फक्त वाट पाहत बसली आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. ते कराडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
'सध्या देशातले वातावरण हे भाजप सरकारच्या विरोधात आहे. पण देशातल्या मोठ्या राजकीय विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय. काँग्रेस तर लोक स्वत:हून आपल्या हातात सत्ता देतील, याची वाट बघत बसले आहेत,' अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले प्रकाश आंबेडकर गुरुवारी कोल्हापूरहून साताऱ्याला जात असताना कराडमध्ये थांबून काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, प्रा. पुष्पलता सकटे, प्रकाश वायदंडे, जावेद नायकवडी, अप्पा बडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आंबेडकर म्हणाले, 'देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता ती हाताबाहेर चालल्याचे दिसते. संविधानच अडचणीत आले आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी आमचा लढा आहे. त्यासाठी मी सर्वत्र फिरत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर जात आहे. गेल्या 70 वर्षांत ज्यांनी लोकसभेत पायही ठेवला नाही, अशा जाती-जमातीतील लोकांना लोकसभेत उमेदवारी देण्याचा आपला निर्धार आहे. जे आजवर सत्तेपासून वंचित राहिले आहेत. त्यांना सत्तेत आणण्यासाठीच आपली ही नवीन लढाई आहे.' असं आंबेडकर म्हणाले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours