कोल्हापूर, 15 जुलैः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) सोमवारी 16 जुलै रोजी एक दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ उद्या दूध संकलित करणार नाही. त्यामुळे राज्यात दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. एकट्या मुंबईला गोकुळकडून सात लाख लीटर दूध पुरवठा केला जातो. राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपयांची दरवाढ करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. संघटनेकडून आता मुंबईला जाणारे दूध रोखण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक दिवस संकलन बंद केल्यामुळे गोकुळला सुमारे 5 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.
स्वाभिमानी संघटना आपल्या निर्णयावर ठाम आहे. कोल्हापूर, सांगली येथे संघटनेचा बालेकिल्ला असल्यामुळे ग्रामीण भागातूनही या आंदोलनाला फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. शनिवारी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सोमवारी एक दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी शेतकऱ्यांना डेअरीत दूध घाला असा आग्रह केला जाणार नाही. पण जर एखादा शेतकरी दूध घेऊन आला तर त्याचे दूध स्वीकारले जाईल, तसेच संकलन केलेले दूध मुंबईला पाठवले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
गोकुळला एक दिवसाचे सुमारे पाच कोटींचे नुकसान होणार असूनही त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, गाईच्या दुधाला आणि दूध पावडरला अनुदान द्यावे अशा मागणी, गोकुळने सर्वातआधी केली होती. यासाठी जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र त्यावर कोणताच निर्णय न झाल्यामुळे गोकुळने एक दिवस संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाय या आंदोलनामुळे राज्य सरकारने संघटनेची मागणी मान्य केली तर त्याचा फायदा दूध उत्पादकांना होणार असल्यामुळे नुकसान सहन करुनही गोकुळने एक दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours