मुंबई : आधीच अतिवृष्टीचा तडाखा सहन करणाऱ्या विदर्भासाठी पुढचे दोन दिवस आणखी संकटाचे ठरू शकतात. कारण सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे उद्या आणि परवा विदर्भातल्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. अतिवृष्टीमुळं नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यानं संबंधित गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसंच अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता असल्यानं त्या दृष्टीनं उपाययोजना करण्याचाही सल्ला देण्यात आलाय. पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय.
पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व-विदर्भात २७ आणि २८ ऑगस्ट तारखेला पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची होण्याची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते. ज्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.
या दरम्यान नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातल्या इतर भागातील हवामानात विशेष बदल होणार नाही. २८ ऑगस्ट नंतर पुढचे काही दिवस राज्यात पुन्हा पाऊस कमी होणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours