पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी सचिन अंदुरेला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सचिन अंदुरेला 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान यावेळी औरंगाबादहून सीबीआयनं सचिनच्या मेहुण्याकडून हस्तगत केलेल्या पिस्तूलातूनच गौरी लंकेश यांची हत्या केली, असा खळबळजनक दावा सीबीआयनं कोर्टात केलाय. त्यामुळं लंकेश यांच्या हत्येत अंदुरेचा सहभाग असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कळसकर, अंदुरेची समोरासमोर चौकशी करण्याची परवानगी द्या अशी विनंती सीबीआयनं कोर्टात केलीये.
औरंगाबादहुन सीबीआयने सचिनच्या मेहुण्याकडून हस्तगत केलेलं पिस्तुल गौरी लंकेशच्या हत्येत वापरलेलं पिस्तुल असल्याची माहिती सीबीआयने कोर्टात दिली आहे. शरद कळसकरची 28 तारखेला पोलीस कोठडी संपतेय तेव्हा त्याला ताब्यात घेऊन सचिन आणि त्याची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यातून गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटात सचिन अंदुरे सहभागी होता का याचा तपास करण्यात येणार आहे.
गौरी लंकेश यांच्या खुनात वापरलेलं पिस्तुल मारेकऱ्यांनी सचिनकडे आणून दिलं होतं. ते पिस्तुल सचिनने त्याच्या मेहुण्याकडे ठेवायला दिलं असल्याची माहिती हाती लागली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातही सचिन अंदुरे सहभाग असण्याचा सीबीआयला संशय आहे. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी सीबीआयच्या तावडेंच्या चार्जशीटवर युक्तिवाद सुरू केला, ज्यात सारंग आणि विनय पवार शूटर असल्याचा उल्लेख केला आहे.
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणांत संशयित म्हणून सीबीआय अमोल काळे याची कस्टडी घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. अमोल काळे याला कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश प्रकरणात अटक केलीये. मूळचा चिंचवडचा असलेला अमोल काळे याने वीरेंद्र तावडे यांच्या मदतीने डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा कट रचल्याच सचिन अंदुरेच्या चौकशीत समोर आल्याचा सीबीआयचा दावा आहे. दाभोळकरांवर गोळ्या झाडणारा आणखी एक आरोपी शरद कळसकर याची नालासोपारा स्फोटक प्रकरणात 28 ऑगस्टला पोलीस कोठाडी संपतेय त्यानंतर त्याला ही सीबीआय दाभोलकरांच्या खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours