पोळ्याच्या दिवशीच शेतक-याने मरणाला कवटाळले

यवतमाळ : शेतक-यांचा सर्वात महत्वाचा सण असलेल्या पोळ्याच्या दिवशीच जर शेतकरी मरणाला कवटाळत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात शेतक-यांना खोटी आश्वासने देऊन निवडून आलेले भाजप सरकार शेतक-यांना मरणाच्या दारात लोटणारे धोरण अवलंबित आहे. त्यामुळे भाजप सरकारची हि ‘मारबत’ आता उचलून पेâकण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केले. 
यवतमाळ तालुक्यातील मनपुर येथिल शेतकरी विजय विश्वनाथ पारधी (वय ५०) यांनी आज पोळ्याच्या दिवशी फाशी घेऊन आत्महत्या केली. त्यांचेवर सेंट्रल बँकेचे ९५ हजार रूपये कर्ज होते. पात्र असून देखील त्यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्याकडे पाच एकर शेती असून चार मुली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे विजय पारधी हे त्रस्त होते. कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामुळे ते हतबल झाले होते.
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, अशोक भुतडा, पंजाबराव घोरसडे यांनी मृतक शेतक-याच्या घरी जाऊन परिवाराची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. आर्थिक चणचणीमुळे शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा असलेला पोळा सणही साजरा करू शकत नसल्याचे शल्य त्यांच्या मनात होते. त्यामुळे ते प्रचंड निराश असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

‘शेतक-यांच्या मारेक-यांना घेऊन जा गे मारबत’

ऐन पोळ्याच्या दिवशी गावात अशी दुर्दैवी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण होते. गावक-यांनी पोळ्यावर बहिष्कार टाकुन भाजप सरकारचा निषेध केला. तसेच ‘शेतक-यांचे मारेकरी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जा गे मारबत’, ‘शेतकरी विरोधी भाजप सरकारला घेऊन जा गे मारबत’ अशा घोषणा देऊन ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला.




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours