मुंबई,ता.10 सप्टेंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत बंद वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही. त्यांना लोकांच्या सुख दु:खाशी देणं घेणं नाही. शिवसेनेचे पैसे अडले की शिवसेना सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी देते आणि पैसे मिळाले की गप्प बसते त्यामुळे शिवसेना काय म्हणते त्याला मी किंमत देत नसल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही त्यांनी घणाघाती टीका केली.
काँग्रेसच्या पुढाकाराने झालेल्या भारत बंदला मनसेने पाठिंबा दिला होता. त्यावरून शिवसेनेनं मनसेवर टीका केली होती. त्याला राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्त दिलं. काँग्रेसच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ झाली तेव्हा भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत भाव कमी का करत नाही असा सवाल केला होता, आता तेच वक्तव्य भाजप आणि नरेंद्र मोदी यांना आठवत नाही का असंही ते म्हणाले.
काँग्रेसने ज्या चुका केल्या त्यापेक्षा जास्त चुका भाजपने केल्या असून भाजप हा काँग्रेसपेक्षाही वाईट आहे आणि भाजपमधली दोन माणसं ही सर्वात वाईट आहेत. भाजप हा सूडबुद्धिने वागत असून आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्ह्यांची कलमं लावली जात आहेत. उद्या हीच वेळ भाजपवर येणार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं असा इशाराही त्यांनी दिला.
राज्य सरकार फक्त खोटी आश्वासनं देत आहे. एवढ्या लाख विहिरी बांधल्या, राज्य हागणदरीमुक्त झालं तर मग सकाळी बाहेर बसणारे मोर आहेत का असा सवालही त्यांनी केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours