जिल्हा सपादक शमीम आकबानी
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

माजी खासदार नाना पटोले यांची कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी किसान, खेत, मजदूर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

नागपूर : माजी खासदार नाना पटोले यांची कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी किसान, खेत, मजदूर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने विदर्भातील राजकारणात बदल होण्याची आता शक्‍यता वाढली आहे. 

गेल्या डिसेंबर महिन्यात भाजपचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांना कॉंग्रेसने अखिल भारतीय स्तरावरील पद दिले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावरून नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून भाजपला रामराम ठोकला होता. यानंतर त्यांची कॉंग्रेसने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यात पटोले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचे फळ म्हणून पटोले यांना राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सोपविल्याचे बोलले जात आहे. नाना पटोले यांच्या नियुक्तीने मात्र विदर्भातील राजकारणात आता बदल होण्याची शक्‍यता आहे. नाना पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात असून विदर्भातील नेत्यांना वरिष्ठ पद दिल्याने विदर्भातील कॉंग्रेस संघटना बळकट होण्यास मदत होणार आहे.







Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours