बीड,18आॅक्टोबर : भगवानगडाच्या वादानंतर पंकजा मुंडेंना भगवानगड सोडावा लागला. त्यानंतर भगवानबाबांच्या जन्मस्थानी अर्थात सावरगावात भव्य स्मारक उभं करत मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी राजकीय शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केलीय.

आधी भगवानगड... त्यानतंर गोपीनाथ गड आणि आता सावरगाव...पंकजा मुंडेंच्या राजकारणाचं नव शक्तीस्थान असणार आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेला भगवान गडावरचा दसरा मेळावा बंद करून पंकजा मुंडेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला. पण पंकजा मुंडेंनी भगवानबाबांचं जन्मगाव गाठून विरोधकांना सावरगावचा घाट दाखवला. त्याच सावरगावात भगवानबाबांचं भव्य स्मारक उभरण्याचा पंकजा मुंडेंचा निश्चय प्रत्यक्षात उतरतोय. दसऱ्याच्या दिवशी स्मारकाचं लोकार्पण करुन पंकजा मुंडे राजकीय शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज झाल्यात.

ज्या मातीत भगवान बाबांचा जन्म झाला ते सावरगाव आजपर्यंत दुर्लक्षित होतं. पण पंकजा मुंडेंच्या गेल्यावर्षीच्या दसरा मेळाव्यानंतर या गावाचा चेहरामोहरा बदलतोय. वादातून का होईना पण सावरगावचं नशीब फळफळलंय. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचतानाचं भगवानबाबांचं स्मारक आणि त्यांचं जन्मस्थान विकसीत होत असल्यानं भगवानबाबांचे वंशज समाधानी आहेत.

भगवानगड हे गोपीनाथ मुंडेंचं शक्तीस्थान होतं. त्या माध्यमातून त्यांनी वंचितांची राजकीय मोट बांधली. त्याभोवती राज्याचं राजकारण फिरतं ठेवलं. पण गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा यांच्याकडून गड काढून घेतल्यानं गडाच्या कन्येला सिमोल्लंघन करावं लागलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours