शिर्डी: सिन्नर तालुक्यातील देवपूर फाट्याजवळ मागून येणाऱ्या भरधाव कारने 20 ते 22 साईभक्तांना चिरडल्याची घटना आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात 3 साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमी साईभक्तांना सिन्नर येथील नजिकच्या रुग्णालयात तर काही जखमींना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

मुबंईतील कांदिवली, समतानगर येथील साईराम पालखी शिर्डीकडे पायी निघाली होती. ही पालखी सिन्नर शिर्डी रस्त्यावर देवपूर फाट्याच्यापुढे पोहोचली होती.तेव्हा भरधाव वेगात आलेली स्विफ्ट कार थेट पालखी घुसली आणि पालखीत चालत असलेल्या 20 ते 22 साईभक्तांना कारने जोराची धडक दिली.

या धडकेनं काही भाविक रस्त्याच्या कडेला शेतात फेकले गेले. तर काही जण जखमी अवस्थेत महामार्गावर पडले होते.कार चालकाला समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटमुळे काहीच न दिसल्यानं कार सरळ पालखीतील भाविकांना चिरडत गेली.

एवढंच नाहीतर पालखीसोबत 25 फुटी देखावा असलेल्या रथालाही कारनं जोरदार धडक दिली. क्रेन आणून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. तर जखमींना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींना शिर्डी आणि सिन्नर इथं उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours