मुंबई : सचिन तेंडुलकर यांचे गुरू आणि विख्यात क्रीडा प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का करण्यात आले नाहीत असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्याच तोडीचे एकाहून एक उत्तम क्रिकेटपटू आचरेकर सरांनी घडवले. त्यांना पद्मश्री हा किताबही दिला होता. असं असतानाही शासकीय इतमामात का अंत्यसंस्कार केले नाहीत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे असंही राज यांनी म्हटलं आहे.

काय आहे राज ठाकरेंचे ट्विट

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्याच तोडीचे एकाहून एक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे रमाकांत आचरेकर सर 'पण' पद्मश्री होते मग त्यांचे अंत्यसंस्कार सरकारी इतमामात का नाही झाले? सरकारने ह्याचं उत्तर द्यायलाच हवं. #RamakantAcharekar

आचरेकर सरांच्या कुटुबीयांशी बोलून सरांच्या नावाने एकादी संस्था सुरू करू असं सांगत क्रीडामंत्री  विनोद तावडे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्याचे क्रीडामंत्री काहीही म्हणत असले तरी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनी मात्र सरकारी यंत्रणांमध्ये विसंवाद झाल्याचं मान्य केलं आणि दिलगिरी व्यक्त केली.

पद्म पुरस्कारप्राप्त श्रीदेवी यांना सरकारनं जो मान दिला, तो मान पद्मश्री असलेल्या आणि मास्टरब्लास्टर सचिनसह अनेक दिग्गज खेळाडू घडवणाऱ्या आचरेकर सरांना मात्र  दिला नाही. त्यामुळे क्रिकेटरसिक कमालीचे नाराज झालेत आणि ट्विटरवरही संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours