मुंबई, 5 जानेवारी : आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते डॉ. दीपक सावंत आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. 7 जानेवारीला त्यांच्या आमदारकीचा कालावधी संपत असल्याने ते राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
दीपक सावंत एक दिवसाचा राजीनामा देऊन पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं यावेळी त्यांना पदवीधर निवडणुकीत संधी न दिल्याने त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलं होतं. पण आता ते पुन्हा मंत्री होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत दीपक सावंत?
आरोग्यमंत्री दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेकडून दोनदा निवडून गेले आहेत. पण यावेळी त्यांचा पत्ता कट झाला. याला कारण त्यांची कार्यपद्धती सांगितली असल्याचं सांगितलं जात आहे. पक्ष कार्यकर्त्यांनाच आरोग्यमंत्री भेटत नसल्याच्या अनेक तक्रारीही 'मातोश्री'वर केल्या गेल्या होत्या. त्याचाच परिपाक म्हणून त्यांना विधानपरिषद आमदारकी गमवावी लागली आहे. यापुढे ते पक्ष संघटनेसाठी काम करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.
दीपक सावंत यांनी खरंतर गेल्या टर्ममध्ये आदिवासी कुपोषित बालकांसाठी चांगलं काम केलं होतं. त्याच बळावर त्यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात आलं होतं. पण यावेळी कुठलीही चमकदार कामगिरी बजावू शकले नाहीत, असा त्यांच्यावर आरोप आहे. अशातच मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणंही त्यांना जमलं नाही. याचीच दखल घेऊन यावेळी मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेनं त्यांच्याऐवजी विलास पोतणीस यांना संधी दिली.
Post A Comment:
0 comments so far,add yours