रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत देखील आता वाढ होत आहे. मृत्यूदर कमी असला तरी कोरोनाला रोखायचे कसे? शिवाय, गाव-खेड्यांमध्ये देखील आता कोरोनाचा शिरकाव होत आहे. दरम्यान, कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. त्याच पार्श्वभूमिवर आता रत्नागिरी जिल्ह्याने मोठा निर्णय घेतला आहे.

होमिओपॅथी आर्सेनिकम अल्बम 30 जिल्ह्यातील साडेचार लाख घरामध्ये मोफत वाटणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. असे वाटप करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता हा निर्णय घेण्यात आलाय. आशा वर्करमार्फत गोळ्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. केवळ रत्नागिरीच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अशा प्रकारचा निर्णय घेत गोळ्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या गोळ्यांचा खर्च हा कोविड फंडातून केला जाणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours