पुणे, 17 मे : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. मागील 24 तासांमध्ये तर देशात 4 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यातच पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या व्हायरसपासून दूर असलेल्या पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे
जनता वसाहत या झोपडपट्टीत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आधीच दाटीवाटीच्या वस्तीत कोरोनावर नियंत्रण मिळवणं अवघड होत असताना या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाची एण्ट्री झाल्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे. आतापर्यंत जनता वसाहतीत कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याने मोठं समाधान व्यक्त करण्यात येत होतं. मात्र आता काही बाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले आहेत.
दुसरीकडे, शहरातील भवानी पेठेत एकाच इमारतीत 48 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या संपूर्ण इमारतीत 584 जणांचे स्त्राव नमुने घेतले असून पैकी 131 जणांचे अहवाल प्राप्त त्यात 48 जणांना लागण झालेली आहे. तर 453 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या इमारत परिसराची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी डॉ. सौरव राव, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह अधिकारी आणि स्थानिक उपस्थित होते.
पुणे शहरात शनिवारी कशी होती स्थिती?
पुणे शहरात काल नव्याने 202 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 3 हजार 295 झाली आहे. तर 68 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 1 हजार 412 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काल 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील एकूण तपासणी आता 30 हजार 224 झाली असून आज 1 हजार 205 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या. शहरातील 68 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यात नायडू-पुणे महापालिका 57, खासगी रुग्णालये 9 आणि ससूनमधील 2 रुग्णांचा समावेश आहे.
जनता वसाहत आणि कोरोनावरील उपाययोजना
सुमारे 100 एकरचा परिसर, 70 हजार इतकी लोकवस्ती, 5 वेगवेगळे रस्ते आणि शेकडो चिंचोळ्या गल्ल्या....पर्वतीच्या पायथ्याशी आणि मुठा कालव्याच्या काठावर पसरलेल्या जनता वसाहत झोपडपट्टीतील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजे कंटेन्मेंट झोनमध्ये नसतानाही सगळी बंधने स्वतःहून लादून घेतली. एकच मुख्य रस्ता येण्या-जाण्यासाठी खुला ठेवणे, दुकानात किंवा मंडईत गर्दी न करता घरपोच भाजीपाला आणि धान्य यांचं वितरण करणे, रुग्णांची वेळेवर नित्य तपासणी ,मास्क, सॅनिटायझरचा वापर, निर्जंतुकीकरण, सार्वजनिक स्वच्छता यावर भर दिल्याने कोरोनाचा शिरकाव होऊ न देण्याची किमया इथल्या रहिवाश्यांनी करून दाखवली आहे.
राजकारण, आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून सगळे एकत्र आले. वसाहतीतील विविध सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कामे वाटून घेतली. कालच वसाहतीत राहणाऱ्या 2 जणांना वसाहतीबाहेर गेल्याने लागण झाल्याचे समोर आलं. त्यामुळं सतर्क होऊन आणखी कडक पहारा ठेवण्यात आला आहे.
पुणे शहरातही लाखो लोक विविध झोपडपट्ट्यात राहात आहेत. मात्र मुंबईतील धारावीप्रमाणे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. जनता वसाहतीतील स्वयंस्फूर्त शिस्तीचे अनुकरण दाट लोकवस्ती, झोपडपट्टी परिसरात होण्याची गरज आहे, ज्यामुळे कष्टकरी, हातावर पोट असलेल्यानां कोरोनाची बाधा होणार नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours