मुंबई, 22 जानेवारी: आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. लोकसभा त्रिशंकू असेल आणि म्हणूनच त्याचे नेतृत्व नितीन गडकरी करण्यास तयार असतील असे, शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी युती करण्याचा कोणताही विचार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. युती हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. भाजपशी आम्ही युती संदर्भात कोणतीही चर्चा करत नाही. भाजप स्वत:चा विचार करत आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचा विचार करत आहोत, असे राऊतांनी स्पष्ट केले. 
काँग्रेस शिवाय महाआघाडीला यश मिळणार नाही
केंद्रातील मोदी सरकारविरोधात एकत्र आलेल्या महाआघाडीत जर काँग्रेस नसले तर त्यांना यश मिळणार नाही, असे राऊतांनी सांगितले. 
उत्तर प्रदेशात शिवसेना 25 जागा लढवणार
शिवसेना केवळ महाराष्ट्रातच नाही तर अन्य राज्यात देखील भाजप विरोधात लढणार असल्याचे दिसते. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना उत्तर प्रदेशात 25 उमेदवार उभे करणार आहे. सेना योगी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षा सोबत उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणार आहे. समाज पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांच्याशी शिवसेनेची अनेकवेळा बैठक झाली आहे. ज्या प्रमाणे शिवसेना राज्यात आणि केंद्रात भाजपचा विरोध करत आहेत. त्याच प्रमाणे राजभर देखील गेल्या काही काळापासून योगी सरकारवर टीका करत आहेत. 
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर पक्षाला राज्यात मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा राऊतांनी केला. केवळ उत्तर प्रदेशच नाही तर बिहार आणि जम्मू-काश्मीर या राज्यात देखील शिवसेना मित्र पक्षांच्या शोधात असल्याचे राऊत म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours