विलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा. 

भंडारा, दिनांक २८ जानेवारी:- नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूर विभागातून भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांना उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक चळवळ तरूणांमुळे यशस्वी झालेली आहे. देशातील तरूणाईची संख्या लक्षात घेता लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी युवांनी पुढे यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. येवले बोलत होते. कार्यक्रमास मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार, प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मयी सुमीत, अभिनेता मकरंद अनासपुरे, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. श्याम शिरसाट, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांची मंचावर उपस्थती होती. डॉ. येवले यांनी देशाची प्रत्येक अडचण सोडविण्याची ताकद भारतीय संविधानात आहे. या संविधानाचा तरूणाईने बारकाईने अभ्यास करावा. या हेतूने विद्यापीठात 'भारतीय संविधान' 'राजकारणातील प्रवेश' विषय पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. शिवाय मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याशी झालेल्या चर्चेअंती आवश्यक असणारे निवडणूक प्रक्रियेबाबतचे क्रेडिट कोर्स अभ्यासक्रम देखील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचा विचार सुरू आहे. सुदृढ लोकशाहीसाठी तरूणाईने राजकारण भारतीय संविधान, निवडणूक प्रक्रियांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरुणाईमध्ये लोकशाही मुल्ये रूजावीत, त्यांची जागृती व्हावी यासाठी विविध माध्यमातून विद्यापीठ कार्य करत असल्याचे डॉ. येवले म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. देशपांडे यांनी मतदार दिवसाची पार्श्वभूमी विशद केली. या दिनाचे औचित्य साधून अधिकाधिक युवांपर्यंत पोहचण्याचा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा हेतू आहे. अधिकाधिक युवांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. मतदानाचा हक्क बजावावा. लोकशाही बळकटीकरणासाठी युवांची कामगिरी अत्यंत महत्वाची आहे असे सांगितले. कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या डॉ. पवार संपादित 'लोकशाही समजून घेताना पुस्तकाचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. शिवाय भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशील चंद्रा यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे राष्ट्रीय मतदार दिनाचा संदेश दिला. यामध्ये त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवात आपण राष्ट्रीय मतदार दिन साजरा होत, ही गौरवाची बाब असल्याचे नमूद केले. नव मतदारांना वर्षातून चारदा नाव नोंदणीची सुविधा आयोगाने दिल्याचेही त्यांनी संदेशात सांगून सर्वांना मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. निवडणूक प्रक्रियेत चांगले काम करणाऱ्या बीएलओ ते जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यापर्यंत सर्व स्तरावरील उत्कृष्ट करणाऱ्यांचा गौरव करण्यात काम आला. उत्कृष्ट समाज माध्यम कार्यालय म्हणून सिंधुदुर्ग, धुळे •आणि अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी यांचा गौरव करण्यात आला. विशेष संस्थात्मक योगदान पुस्कार रिजनल आऊटरीच ब्युरो, महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांना प्राप्त झाला. कार्यक्रमात कुलगुरू डॉ. येवले यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ सर्वांना दिली. कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमामध्ये स्वीप ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. नवमतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटप विद्यापीठातील स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. घरगुती गणेशोत्सव सजावट, लोकशाही भोंडला, लोकशाही दीपावली, रांगोळी आदी राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांची नावेही कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता झाली. सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

विविध कार्यक्रमांनी रंगत कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्याहस्ते मतदार जागृती दालनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर अभिनेता अनासपुरे, अभिनेत्री चिन्मयी यांनी मतदान प्रक्रियेबाबतचा सापशिडीचा खेळ खेळला. सेल्फी पॉइंट, लोकशाही भिंतीजवळ छायाचित्रे मान्यवरांनी घेतली. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि शिवाजी महाविद्यालय व विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागांनी पथनाट्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नाट्यगृहातील भव्य रांगोळी स्पर्धात्मक रांगोळींचे मान्यवरांनी पाहणी केली. मुख्य कार्यक्रमात गायक राहुल खरे, संगीतकार गजानन साबळे यांनी मतदान जनजागृती गीत उत्तमरित्या सादर केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours