ठाणे: पावसामुळे ठाण्यात रस्त्यांची चाळण झालीय. खड्ड्यांमध्ये रस्ता की रस्त्यांमध्ये खड्डे हेच नागरिकांना कळत नाहीये. मेट्रोचं सुरू असलेलं काम. त्यातच उन्हाळ्यात जलवाहिन्या आणि ड्रेनेज सिस्टिम दुरुस्तीसाठी खोदून ठेवलेले सर्व्हिस रोड यामुळे गाडी चालवणं हे अतिशय कठीण काम झालंय. याच खड्ड्यांमुळे ठाण्यात आणखी एका चिमुकल्याचा बळी गेलाय. पण प्रशासन आणि कंत्राटदार ठिम्म असून आणखी किती बळी जाणार असा सवाल विचारला जातोय.
ठाण्यात गुरुवारी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एका 5 वर्षांच्या चिमुकल्याचा नाहक बळी गेलाय. मात्र पोलिसांनी वाहन चालकाचा हलगर्जीपणा असा गुन्हा दाखल करत वाहन चालकाला अटक केलीय. पण ज्या अधिकारी आणि कंत्राटदारांमुळे रस्ता खराब झाला होता, ज्यांनी आपलं कर्तव्य नीट पार पाडलं नाही त्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
वेदांत दास असं त्या चिमुकल्याचे नाव असून रक्षाबंधनासाठी  वेदांत आपल्या आई वडिलांसह दुचाकीवर ठाण्यात आला होता. पाहुण्यांकडे जात असतांना घोडबंदर रोडवर असलेल्या सिमेंट आणि डांबरी रस्त्याच्यामध्ये असलेल्या फटीमध्ये वेदांतचे वडील चालवत असलेली गाडी फसली आणि तोल जाऊन वेदांत रस्त्यावर पडला तोच मागून भरधाव वेगाने येणारं अवजड वाहन वेदांत वरुन गेल्याने वेदांतचा जागीच मृत्यू झाला. दास कुटुंब हे घणसोली इथं राहत असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours